उदयनराजेंना लोकसभेसाठी `या` दोन पक्षांनी दिल्या ऑफर
आता उदयनराजे काय पाऊल उचलणार?
मुंबई: उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाकडून जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता रामदास आठवले आणि नितेश राणे यांनी उदयनराजेंसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. रामदास आठवले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंना तिकीट नाकारल्यास त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असे आठवले यांनी म्हटले.
तर दुसरीकडे काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी उदयनराजेंना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. उदयनराजे एक ताकदवान नेते आहेत. आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. त्यांचेही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात स्वागत आहे, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
त्यामुळे आता उदयनराजे काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी रविवारी मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास अनेक नेत्यांनी विरोध केला. साताऱ्यातून रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.
या बैठकीनंतर उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहोत. पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र, शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.