मुंबई: दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर देशातील राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी पत्रकारपरिषद घेऊन यासंदर्भात भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'जेएनयू'तील हल्ल्याची तुलना मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याशी केली. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. महाराष्ट्रात असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हीडिओ मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया'वर रविवारी रात्री झालेल्या आंदोलनाचा आहे. या आंदोलनावेळी एक महिला Free Kashmir असा मजकूर लिहलेला फलक झळकावताना दिसत आहे. 


हाच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. हे आंदोलन नक्की कशासाठी आहे? Free Kashmir चा नारा कशासाठी? मुंबईत अशा फुटीरतवादी घटकांना आपण सहनच कसे करु शकतो? मंत्रालयापासून अवघ्या काही अंतरावर Free Kashmir चे नारे दिले जातात. उद्धवजी तुमच्या नाकाखाली Free Kashmir देशद्रोही मोहीम सुरु आहे. हे तुम्ही खपवून घेणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या सगळ्यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



दरम्यान मुंबईत सुरु असलेल्या जेएनयूच्या आंदोलनाला बॉलिवूडच्या कलाकारांनीही पाठिंबा दर्शवला आहे. अनुराग कश्यप, राहुल बोस, तापसी पनू, अनुभव सिन्हा, झोया अख्तर, दिया मिर्झा यांनी कार्टर रोड या ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनात उपस्थिती दर्शवत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.