उद्धव साहेब हेच नवं चिन्ह निवडा... मनसेने डिवचलं
उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्ह जाऊ शकते?
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष सुरु असताना आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्हही (Dhanushya Ban) जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या धनुष्यबाण चिन्हबाबत लढाई न्यायालयात सुरु आहे. कायद्याच्या लढाईत अपयश आलं तर गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवं चिन्ह मिळेल त्या चिन्हाची तयारी ठेवा, असे आवाहन ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. नवं चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा, असेही आवाहन ठाकरे आंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसेने डिवचलं
दरम्यान, चिन्हावरुन मनसेने डिवचलं आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेला चिन्हावरून छेडलंय. धनुष्यबाण चिन्ह पक्षाकडून जाण्याची शक्यता निर्माण झाली असताना त्यांनी मशिदीवरील भोंग्याचं चित्र ट्विट केलंय आणि उद्धव साहेब हेच चिन्ह निवडा, किमान दिवसातून 5 वेळा तरी वाजेल असा टोला लगावलाय..
पक्षातील गळती थांबावी म्हणून छोटे नवाब आता निष्ठा यात्रा काढणार आहेत म्हणे, खरं तर 'चमत्कार बाबा' संजय राऊत यांना कायमचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवलं तरी यांच्या नवाब सेनेवरील विघ्न टळेल, मात्र यांचं आपलं झालंय असं की जखम एकीकडे, मलम भलतीकडे असा टोलाही गजानन काळे यांनी लगावला आहे.
'चिन्ह काय राहिल'
सध्या जे काही सुरु आहे ते कृत्रिम वादळ आहे. ते दूर होईल आणि शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील. भाजपला चाळीस नवे भोंगे मिळाले आहेत, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या हो. धनुष्य बाण हे चिन्ह शिवसेनेचे आहे आणि शिवसेनेचेच राहील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.