दिनेश दुखंडे, मुंबई : राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू नसतो, हे शुक्रवारी पुन्हा एकदा सिद्ध झालं. भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप शिवसेनेनं केला होता. पण शुक्रवारी मात्र वेगळंच चित्र दिसलं. भाजप-शिवसेनेत नक्की काय चाललंय, पाहुयात हा रिपोर्ट...


शिवसेना फोडण्याचा झाला होता आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेला हा खळबळजनक आरोप... भाजपचे राज्यातले सध्याचे क्रमांक दोनचे नेते म्हणजे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील... ते शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत असल्यानं शिवसेना नेतृत्वाचं पित्त खवळलं... त्यावरून भाजप शिवसेनेत वितुष्ट आलं होतं... मध्यंतरी ग्रामीण भागातली शिवसेना आमदारांची अस्वस्थता भाजप नेत्यांनी अचूक हेरली होती. 


भाजपची खेळी आणि अचूकता


शिवसेना मंत्र्यांच्या माध्यमातून आमदारांची कामं होत नव्हती, त्यामुळं आमदार स्वतःच्याच मंत्र्यांवर नाराज होते. तर दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांची कामं करण्यासाठी पुढाकार घेतला. चेंबूरचे आमदार तुकाराम कातेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्री गणपती दर्शनाला गेले. 


शिवसेना आमदारांची शिवसेनेच्या मंत्रयांच्या माध्यमातून आमदारांची कामे होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यायची आणि दुसरीकडे स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांचा प्रश्न सोडवायचा ही भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वाची व्यूहरचना आहे. तसेच शिवसेनेतल्या असंतुष्ट आमदारांच्या कुटुंबियांचीही स्थानिक विविध समित्यांवर वर्णी लावून त्यांना उपकारांच्या दडपणाखाली ठेवण्याचीही भाजपची खेळी आहे.


देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे एकत्र 



पण शुक्रवारचं चित्र काहीसं वेगळंच होतं. मुंबईच्या महापौर बंगल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यांच्यात चांगला संवाद दिसत होता. कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्याना सोडण्यासाठी बाहेरपर्यंत आले.


चंद्रकांत पाटील शिवसेना मंत्र्यांच्या गराड्यात


आश्चर्याची बाब म्हणजे या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील चक्क शिवसेना मंत्र्यांच्या गराड्यात होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम उजव्या बाजूला आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते त्यांच्या डाव्या बाजूला होते. रामदास कदम आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बराच काळ गुफ्तगू आणि हास्यविनोद सुरु होते. 


ख्यालीखुशालीचा संवाद साधला


जाता जाता चंद्रकात पाटलांनी रश्मी ठाकरे यांच्याशीही ख्यालीखुशालीचा संवाद साधला. राज्यमंत्री रवींद्र वायकर तर त्यांना महापौर निवासाच्या बाहेर सोडण्यासाठी आले होते. ते गाडीत बसत असताना मीडियानं त्यांच्याकडं शिवसेनेच्या आरोपांबाबत विचारणा केली, तेव्हा आपण बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आलो होतो, एवढंच उत्तर दिलं.


चंद्रकांत पाटलांचा खुललेला चेहरा


शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांवर केलेले आरोप आणि त्यावरून निर्माण झालेलं वादळ अखेर चहाच्या पेल्यातलं वादळ ठरलं. महापौर बंगल्याबाहेर पडताना चंद्रकांत पाटलांचा खुललेला चेहरा बरंच काही सांगून गेल्याचे लक्षात आल्यानं त्यांची खेळी वेळीच मोडून काढण्यासाठी शिवसेनेतून त्याचा बंदोबस्त करण्यास सुरुवात झालीय.


त्यामुळेच की काय, हर्षवर्धन जाधवांच्या बाबतीत १३ ऑक्टोबरला झालेल्या घटनेचा गौप्यस्फोट करण्यासाठी तब्बल एका महिन्यानंतरचा म्हणजे काल १५ नोव्हेंबरचा मुहूर्त काढण्यात आला. तेही उद्धव ठाकरे यांच्या कन्नड दौर्यानंतर अवघ्या ४८ तासांनंतरचा .हा सर्व घटनाक्रम पाहाता हर्षवर्धन जाधव यांच्या आरोपांचा साक्षात्कार जरा संशयास्पदच बनलाय.