मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांवर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. राऊतांचे अलिबागमधील आठ प्लॉट्स आणि दादलमधील एक फ्लॅट्स जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतल्या १ हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीनं संपत्तीवर टाच आणल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तातडीनं संजय राऊत (Sanjay Raut) यांना फोन करून माहिती घेतली. या कारवाईच्या अनुषंगानं दोघांशीही बोलणं झालं असून काही झालं तरी झुकायचं नाही, अशीच महाविकास आघाडीची भूमिका असल्याचं राऊतांनी सांगितलं.


केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन शिवसेनेच्या नेत्यांना त्रास दिला जातोय, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.


सुडबुद्धीने आणि आकसाने केलेली ही कारवाई आहे. आमचा पत्राचाळ गैरव्यवहाराशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे भाऊ शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे.


संजय राऊत निर्दोष होते, तर त्यांनी पंचावन्न लाख परत का केले, असा सवाल किरीट सोमय्यांनी केलाय. राऊतांची आणखीही मालमत्ता जप्त होऊ शकते, असा इशाराही किरीट सोमय्यांनी दिलाय.  


सूडबुद्धीनं केंद्रीय यंत्रणांमार्फत कारवाई सुरू असल्याचा आरोप नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. केवळ आकसापोटी चौकशी आणि कारवाई सुरू असल्याचंही शिंदे यांचं म्हणणं आहे. 


राऊतांवर ईडीनं केलेल्या कारवाईवर बोलताना असल्या कारवाईनं शिवसेना घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलीय.