`पुढची ५-१० वर्ष अशीच पुस्तकं लिहा`, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस यांच्या `अर्थसंकल्प सोप्या भाषेत` या पुस्तकाचं प्रकाशन विधिमंडळात करण्यात आलं.
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचं प्रकाशन विधिमंडळात करण्यात आलं. या कार्यक्रमाला सगळ्या पक्षांच्या दिग्गजांची उपस्थिती होती. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, चंद्रकांत पाटील हे या कार्यक्रमाला आले होते.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. आमच्या अर्थसंकल्पावेळी हे पुस्तक लिहिलं आहे. पुढची ५-१० वर्ष असंच पुस्तक लिहत राहा, म्हणजे आम्ही अर्थसंकल्प चांगल्या पद्धतीने सादर करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'नोटबंदी हा विषय अर्थसंकल्पात यायला हवा होता का नाही? मला माहिती नाही,' असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थिती केली. तुम्ही पुस्तक लिहिलं आणि मी उपस्थित राहिन, असा प्रसंग येईल हे मला वाटलं नव्हतं. आपला कार्यक्रम कसा दुसऱ्यांच्या खर्चाने करावा, हे तुमच्याकडून शिकावं, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.