मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-राहुल गांधींची फोनवर काय चर्चा झाली?
राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांत संवाद
रामराजे शिंदे, नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर सुरु झालेल्या उलटसुलट चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना फोन करून सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान राखला जाईल, असं आश्वासन दिलं. तर कोरोनाविरोधी लढ्यात काँग्रेसचं पूर्ण सहकार्य राहील असं आश्वासन राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं.
महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार नाही, निर्णय प्रक्रियेत आम्ही प्रमुख सहभाग नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याची उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. आघाडीतील नेत्यांनीही याबाबत सारवासारव करताना महाराष्ट्रात काँग्रेसचं नव्हे, तर महाविकास आघाडीचे सरकार असल्याचा खुलासा केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फोन करून संवाद साधला.
महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान राखला जाईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना दिलेच. शिवाय निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेतलं जात असल्याची भूमिकाही सांगितली. राहुल गांधींनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
राहुल गांधी यांनीही त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ ट्वीट करून महाराष्ट्र सरकारबाबत अविश्वास दाखवला नव्हता असं स्पष्ट केलं.
राहुल गांधी म्हणाले होते, मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि त्याकडे लोकांचं लक्ष आहे. तिथे कठीण परिस्थिती आहे आणि केंद्राने या राज्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता. तर राहुल गांधी यांनीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं ट्वीट करून सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी व्हिडिओदेखिल ट्वीट केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून झालेली चर्चा पाहता दोन्ही पक्षांकडून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसते.