Raj Thackeray: `बाळासाहेबांच्या नावापुढचं हिंदूहृदयसम्राट काढून जनाब लागलं`
राज ठाकरे यांनी आज हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत युती केल्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणातील परिस्थितीवर आज चौफेर टीका केली. झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांना थेट उत्तर दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये सहभागी झालेल्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर यांनी बाळासाहेबांच्या नावापुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं. एका होर्डिंगवरती उर्दूमधील एका होर्डिंगवर बाळासाहेबांच्या अगोदर काय लावलं जनाब? म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्यायच्या फक्त सत्तेसाठी आणि पैशांसाठी आणि उद्या हातातलं गेलं की तुम्ही बाळासाहेबांच्या नावाने जप करत बसायचा. मराठी माणसाने फक्त एवढंच बघत बसायचं का?'
'हे ढोंगी आहेत. हे फक्त बाळासाहेबांच्या नावाचा वापर करत आहेत आणि वापर करून जेवढं पदरात अजून घेता येईल तेवढं चालू आहे. ज्यावेळेला असल्या प्रकारचे दिवस येतात त्यावेळेला असा चेहरा करून जायचं लोकांसमोर... मला कळलं नाही. इतके दिवस आजारी होते, मंत्रालयात जात नव्हते आता शिवसेना भवनला जातात. झालं बरं झालं सगळं.? असा सवाल ही त्यांनी केलाय.'
राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेवर ही जोरदार टीका केली.