दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना डिवचले.


पदर ढळला की हे घडायचेच !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुक्ताई नगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना 'खतम' करण्यासाठी ज्या सत्तेचा गैरवापर केला तीच सत्ता आज खडसे यांच्यावर उलटली आहे आणि उपेक्षा मानहानीच्या भट्टीत त्यांना भाजून काढीत आहे. मीच हरीशचंद्राचा अवतार असून भाजपने माझे पंचप्राण परत देऊन लाल दिव्याच्या पालखीत बसवावे असे त्यांना वाटत असले तरी सध्या यमाला शरण आणणारे मांगल्य राजकारणात उरले आहे काय ? या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत. अशोक चव्हाण व अजित पवार यांची त्यांना 'खुली' ऑफर आहे. पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच.


खडसे राजकारणातून बाद


विरोधी पक्षनेते म्हणून व नंतर महसूल मंत्री म्हणून स्वतःलाच गाजवणारे एकनाथ खडसे हे आज भाजपच्या राजकारणातून तसे बाद झाले आहेत. व महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांना पूर्वीचे स्थान उरलेले नाही. जेथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याची वेळ नाथाभाऊ खडसेंवर का यावी, हा राजकीय अभ्यासाचा विषय आहे.


ते हिरो बनायला निघाले होते


मुक्ताईनगरचे आमदार एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती समजून घेतली पाहिजे. राज्यातील सत्ताबदलानंतर ते मुख्यमंत्री व्हायला म्हणजे हिरो बनायला निघाले होते, पण राजकीय रंगमंचावर त्यांना जो 'साईड रोल' मिळाला तोदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढून घेतला.


खडसे वाटाण्यासारखे ताड ताड उडताहेत


खडसे आज संतापले आहेत व चुलीवरील तापलेल्या तव्यावर वाटाणे जसे ताड ताड उडतात तसे ते उडत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडसे यांना मंत्रीपदावरून जावे लागले. त्यासंदर्भातील चौकशी समितीचे भिजत घोंगडे तसेच ठेवले गेले आहे. ते घोंगडे खडसे यांच्या डोक्यावर टाकून त्यांना अंधारात ढकलले जात आहे.


खडसेंच्या काळात विरोधकांची ‘दुकानदारी’


सत्तेचाच वापर किंवा वारेमाप गैरवापर करून खडसे यांनी राजकीय विरोधकांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नव्हती. खडसे यांच्या काळात विरोधी पक्ष नेत्यांची कशी 'दुकानदारी' सुरु होती यावर श्री. शरद पवार यांनी मार्मिक भाष्य करून खळबळ उडवून दिली होती.


खडसे यांचा ढळलेला पदर ओढण्याचे काम


खडसे यांचा ढळलेला पदर ओढण्याचे काम अधूनमधून काँग्रेसवालेही करीत असतात. घरांदाजपणाचे राजकारण संपले की असे 'चवचाल' प्रकार सुरू होतात. ते कधी काँग्रेसच्या तर कधी राष्ट्रवादीच्या शेजेवर चढून जुन्या जमान्यातील चारित्र्य, निष्ठा वैगरे बोलत असतात.