मुंबई : काँग्रेसला पराभूत करून सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या काळत तरी, सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेला दहशतवाद थांबेल अशी आशा होती. पण दुर्दैवाने दहशतवादी हल्ले आणि पाकड्यांचे गोळीबारही कमी झालेले नाहीत. आमचे जवान मारले जात आहेत. तरीही केंद्र सरकार खुळचटासारखे बसून आहे, अशी थेट टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमेपलीकडून केला जाणार गोळीबार आणि दहशतवादी हल्ले. त्यात मृत्यू पावणारे जवान, स्थानिक जनता आणि जनावरे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांवर ओढावणारी स्थिती यांवर शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये 'सरकार खरेच बुळचट आहे काय?' या शिर्षकाखाली एक लेख ठाकरे यांनी एक लेख लिहीला आहे. या लेखात केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत ठाकरे यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली आहे.


सरकारच्या शौर्याचा बुडबुडा फुटला आहे काय?


देशातील सरकार खरोखर खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय? सरकारचा प्रवास नामर्दानगीच्या दिशेने सुरू झाला आहे काय? सरकारच्या शौर्याचा बुडबुडा फुटला आहे काय? बेडूक फुगला होता आणि त्या बेडकाचे पोट फुटले आहे काय? ढोल वाजवून आनंद साजरा करणाऱ्यांचा ढोल आधीपासूनच फुटका होता काय? असे अनेक प्रश्न फक्त आमच्या मनात घुसळत नसून सामान्य जनतेच्या मनातही उसळत आहेत. हे प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा आमच्यावर मोदीविरोधाचा ठपका ठेवला जातो, पण कश्मीरात काल जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील असाच आक्रोश करून देशवासीयांच्या मनातील भावनांनाच वाट मोकळी करून दिली आहे. एका सैनिकाचे मरण हे देशाचे मरण असते व कोणताही सैनिक युद्धाशिवाय मारला जातो तेव्हा ती सरकारची नाचक्की ठरते. जम्मू-कश्मीरमध्ये आणि सीमेवर अशी नाचक्की गेल्या दोन-तीन दशकांपासून सुरू आहे. विद्यमान सरकारच्या काळात ती थांबेल असे वाटले होते, पण दुर्दैवाने दहशतवादी हल्ले आणि पाकड्यांचे गोळीबारही कमी झालेले नाहीत आणि आमच्या जवानांचे युद्धाशिवाय हुतात्मा होणेदेखील थांबलेले नाही. आपले सरकार बुळचट निघाले आहे. पाकड्यांचे हल्ले रोजच सुरू असून आमचे जवान मारले जात आहेत. तरीही केंद्र सरकार खुळचटासारखे बसून आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.


पाकिस्तान गोळीबार करत होते तेव्हा पंतप्रधान निवडणूक प्रचारात होते


दरम्यान, आमचे जवान गस्त घालीत होते तेव्हा पाकिस्तानचे सैतान आमच्या जवानांवर गोळीबार करीत होते. पंतप्रधानांसह सारे मंत्रिमंडळ गुजरातेत निवडणूक प्रचाराच्या ‘वाफा’ दवडीत होते तेव्हा पाकडे आमच्या जवानांवर ‘तोफा’ डागीत होते. कश्मीरात शांतता व सुव्यवस्था परतली आहे असा दावा करणाऱ्यांचे हे फोलपण आहे. गुजरातमधून विकास हरवला आणि कश्मीरच्या सीमेवरून सुव्यवस्था व शांतता हरवली, असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली आहे.