`ज्यासाठी रक्ताच्या नद्या वाहिल्या तो राम सर्वच राज्यांतून हरवला`
बलात्काराच्या ज्या घटना घडल्या आहेत त्यात भाजपचे आमदार आरोपी आहेत. त्यामुळेच बलात्कार रोखणे प्रभू श्रीरामासही शक्य नाही असे राज्यकर्त्यांना वाटत असावे काय?
मुंबई: 'ज्या राममंदिरासाठी अयोध्येत रक्ताच्या नद्या वाहिल्या तो राम सर्वच राज्यांतून हरवला आहे. रामावर विसंबून राहू नका, तो अबलांच्या इज्जतीचे रक्षण करू शकत नाही, असे भाजप नेत्यांनी बजावले. मग आता करावे काय? बलात्कार ही विकृतीच आहे, पण म्हणून सर्व रामभरोसे सोडायचे? मग राज्यकर्ते म्हणून मिरवायचे कशाला? हा रामप्रभूंचा अपमान आहे', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बलात्कार प्रकरणात भाजपचे आमदार आरोपी
बलात्काराच्या घटना रोखणे प्रभू रामचंद्रांनाही शक्य नसल्याचे वक्तव्य भाजपचे आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी केले होते. या वक्तव्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये एक लेख लिहीला आहे. या लेखात उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. आपल्या लेखात उद्धव ठाकरे म्हणतात, 'हिंदुस्थानात रामराज्य आणायची भाषा ‘भाजप’ मंडळी करीत असतात. हे रामराज्य कसे असेल याचा खुलासा आता झाला आहे. उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात बलात्कार, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर तोडगा काढायचे राहिले बाजूला, उलट बलात्काराच्या घटना रोखणे प्रभू रामचंद्रांनाही शक्य नसल्याचे भाजपतर्फे जाहीर केले. उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी तसे उघडपणे सांगितले आहे. उत्तर प्रदेशात बलात्काराच्या ज्या घटना घडल्या आहेत त्यात भाजपचे आमदार आरोपी आहेत. त्यामुळेच बलात्कार रोखणे प्रभू श्रीरामासही शक्य नाही असे राज्यकर्त्यांना वाटत असावे काय?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
पंतप्रधान मोदींचा ‘अच्छे दिन’चा वायदा फेल
दरम्यान, हिंदुस्थानात मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमताचे राज्य येऊनही रामराज्य निर्माण झाले नाही. अयोध्येतील प्रभू श्रीराम वनवासात आहेत व राममंदिर उभे राहू शकले नाही, ते कधी उभे राहील ते ‘रामराज्य’वाल्यांनाही सांगता येणार नाही. बलात्कार होतच राहतील असे सांगणे म्हणजे राज्य करणे नव्हे. पंतप्रधान मोदी हे ‘अच्छे दिन’आणतील असा वायदा होता, पण महागाईपासून काळ्या पैशांपर्यंत एकही ‘वादा’ पूर्ण झाला नाही. लोकांना थापा मारून पुनः पुन्हा राज्य आणायचे याच नीतीला ‘चाणक्य’नीती म्हणायचे असेल तर कसे व्हायचे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.