मुंबई: महाविकासआघाडी सरकारच्या कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी शनिवारी प्रसिद्ध झाली. या यादीतील शेतकऱ्यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत १ लाख १० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. येत्या सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली. प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्यापारी बँकाकडून २४ तासांमध्ये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून ७२ तासांमध्ये रक्कम जमा केली जाते.


महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी ३५ लाख शेतकर्‍यांपैकी केवळ १५ हजार ५५८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्यही केले होते. मात्र, आज सरकारने २१ लाख ८२ हजार लाभार्थ्यांची नावे प्रसिद्ध केल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला. 


ही यादी जाहीर झाल्यानंतर आज दिवसभरात ७३ हजार शेतकऱ्यांनी आपल्याला कर्जमाफी मान्य असल्याचे कळवले. त्यापैकी १४ हजार ३०० शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसेही वळते करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी इंटरनेट नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा करण्यात अडचणी येत आहेत. यापूर्वी पहिल्या टप्प्यात १५३३८ शेतकऱ्यांना एकूण ९७ कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली होती. यापैकी १३ हजार ७०० शेतकऱ्यांच्या खात्यात ६२ कोटी रुपये वळते करण्यात आले आहेत.