मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून धनगर आरक्षणाची मागणी होत आहे. युती झाल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे हे धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. याआधी भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेना आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत होती. पण आता पुन्हा युती झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अॅक्शन मोडमध्य़े आलेले दिसत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी 2014 साली विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही घोषणा अजून अमंलात आलेली नाही. सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची ही घोषणा सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाले तरी प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील चार वर्षात भाजपकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याचं भाजपनं वारंवार आश्वासन दिलं आहे. यासाठी धनगर समाजाचा सर्व्हे करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर धनगर आरक्षणाबाबत सरकार एकही शब्द काढायला तयार नाही. यामुळे नाराज असलेला धनगर समाज आम्हाला आरक्षण कधी देणार अशी विचारणा करतो आहे. धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन ऑगस्ट 2018 मध्ये धनगर समाजाच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानंतर टीसचा अहवालही सरकारला प्राप्त झाला. मात्र या अहवालाबाबत सरकारकडून कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही. दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भातला मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाल्याबरोबर सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. सरकारच्या या भूमिकेवरून धनगर नेत्यांमध्ये आणखीनच अस्वस्थता पसरली आहे.


धनगर आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला प्राप्त होऊन दोन महिने उलटून गेले आहेत, तरी या अहवालाचं काय करणार हे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं नव्हतं, आता हा अहवाल केंद्राकडे पाठवून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत पाठपुरावा केला जाईल असं सांगत सरकारने केंद्राच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे.


एकवेळ मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, पण धनगर आरक्षणाचा मुद्या सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरलाय. इतर राज्यांत धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळतं. महाराष्ट्रात एसटीत आरक्षणाची मागणी धनगर समाजानं केलीय. मात्र या मागणीला राज्यातील आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे.


धनगर आरक्षणावरून इकडे आड तिकडे विहीर अशी राज्य सरकारची विशेषतः सत्ताधारी भाजपची अवस्था होणार आहे. धनगरांना एसटी प्रवर्गात आरक्षण दिले तर राज्यातील सर्व आदिवासी समाज विरोधात जाईल आणि धनगरांना आरक्षण देण्याचं निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर धनगर समाज विरोधात जाईल अशी स्थिती आहे.