Naresh Mhaske on Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येतेय तसतसे ठाकरे गट आणि शिंदे गटातील भांडणे विकोपाला चालली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी काही वादग्रस्त बॅनर लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालंय...या बॅनरवर "घालीन लोटांगण वंदीन चरण..असे लिहून उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र दर्शविण्यात आलंय...या बॅनरमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालत बॅनर काढलाय.दुसरीकडे खासदार नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केलेयत. 


ठाकरे-गुप्ता भेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण अफ्रिकेत अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एकजण दिल्लीत आला होता. या गुप्ताची उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. या गंभीर आरोपाने खळबळ उडाली असून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही म्हस्के यांनी आज केली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.  


'तपास यंत्रणांनी चौकशी करावी'


दक्षिण आफ्रिकेत गुप्ता बंधू यांनी अब्जावधी रुपयांचा रॅण्ड घोटाळा केला आहे. याप्रकरणातील एक आरोपी गुप्ता दिल्लीत आला होता, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याची अर्धा तास भेट घेतली असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. गुप्ता आणि उद्धव ठाकरे यांची भेट उघड होऊ नये यासाठी दिल्लीतील संजय राऊत यांच्या घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कदाचीत बंद ठेवले असतील. पण, या भागातल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत यात हा प्रकार उघड होईलच याची तपास यंत्रणांनी दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे. 


'इलेक्शन फंड जमा करण्यासाठी'


सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे कट आणि कमिशनचे कंटेनर येणं बंद झालं आहे. आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल ना? असा संशय ही त्यांनी व्यक्त केला. म्हस्के पुढे म्हणाले की, राऊतांच्या बंगल्यात 7 तारखेला संध्याकाळी काळ्या काचेच्या गाडीतून कोण आलं होतं? वादग्रस्त गुप्ता बंधूना उद्धव ठाकरे नक्की कशासाठी भेटले याचा उलगडा जनतेसमोर झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 


'मुख्यमंत्री पदाची भीक'


मला मुख्यमंत्री पद द्या अशी भीक उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस हायकामांडकडे मागितली, यासाठीच त्यांचा तीन दिवसीय लोटांगण दिल्ली दौरापार पडला. पण काँग्रेसने त्यांना हूसकावून लावले आहे. दिल्लीत त्यांना कुणी भाव दिला नाही,अशी टिका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.राष्ट्रवादीच्या एका नेत्यालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यात उद्धव ठाकरे यांचा अडसर ठरू नये म्हणून त्यांना अडकवण्यासाठी संजय राऊतांनीच गुप्ता बंधूंची भेट घडवून आणलेली नाही ना? असा सवाल उपस्थित करून म्हस्के यांनी आघाडीतील बिघाडी असल्याचा टोला लगावला.