उद्धव ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवारांना भेटीसाठी वेळ दिली नाही
शिवसेना-भाजपमधला संघर्ष वाढण्याची शक्यता
मुंबई : शिवसेना-भाजपमधला संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी उद्धव ठाकरेंना ताटकळत ठेवण्याचा वचपा शिवसेनेनं काढला आहे. 16 एप्रिलला पूर्वनियोजित भेट भेट ठरलेली असतानाही उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना भेटीसाठी वेळ दिलेली नाही. अदमदनगरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी शिवसेनेत प्रचंड रोष आहे. त्यातच नाणारच्या करारावरुनही शिवसेना-भाजपमधले संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुनगंटीवारांना भेटीची वेळ दिलेली नाही.
उद्धव ठाकरे परदेश दौ-यावरून आल्यावर 16 एप्रिलला चर्चा करायची, असं काही दिवसांपूर्वी ठरलं होतं. पण गेल्या काही दिवसांत नाणार प्रकल्प, नगरमधल्या घडामोडी लक्षात घेता शिवसेना-भाजपमधले संबंध आणखी ताणले गेलेत. विशेषतः भाजपाने मुका घेतला तरी युती नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यामुळे शिवसेना-भाजपमधला तणाव निवळेपर्यंत युतीच्या बोलणीबद्दलचं घोडं अडलेलंच आहे.