मुंबई : उद्धव ठाकरे यांचा शपथविधी बेकायदा असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तुमच्या श्रद्धा असू शकतात, पण जो फॉरमॅट असतो त्यानुसारच शपथविधी घ्यावा लागतो. हा शपथविधी बेकायदेशीर आहे. तो रद्द करावा अशी याचिका राज्यपालांकडे दाखल होऊ शकते. राज्यपालांनी न्याय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. शिवाजी पार्कवर झालेल्या कार्यक्रमात शपथ घेताना मंत्र्यांनी त्यांच्या सर्वोच्च नेत्यांची नाव घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुमतावर विश्वास असेल, तर गुप्त मतदान घ्या, घाबरता कशाला? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. आमदारांना १ महिना डांबून ठेवलं आहे. अशा पद्धतीने सरकार चालवता येणार नाही, असं पाटील म्हणाले. नवीन सरकारने शपथविधी घेतल्यापासून विधिमंडळाचे सगळे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे. हंगामी अध्यक्ष नियुक्त केल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत हंगामी अध्यक्ष कायम असतात, पण या सरकारने हंगामी अध्यक्ष बदलला. सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाआधी अध्यक्षपदाची निवडणूक होते, पण यांनी आधी विश्वासदर्शक ठराव ठेवला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.


चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जी प्रथा भाजपने सुरु केली आहे, ती पहिल्यांदा त्यांनी दुरुस्त करावी. भाजप शपथेवर आक्षेप घेत आहे, पण तसं झालं तर संसद रिकामी करावी लागेल, असं नवाब मलिक म्हणाले. 


भाजपने आमचं आव्हान स्वीकारावं, त्यांनी ११९ आमदार कुठे आहेत ते दाखवावं. भाजपचे आमदार चलबिचल झाले आहेत. आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले काही आमदार स्वगृही परतण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही फोडाफोडीचे राजकारण केलं तर भाजप रिकामं होईल, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. 


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची आज पहिली परीक्षा आहे. विधानसभेमध्ये आज उद्धव ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. तर उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. काँग्रेसने नाना पटोले यांना अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवलं आहे, तर किसन कथोरे हे भाजपकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत.