मुंबई: मला शिवसैनिकांवर आदित्यचे नेतृत्त्व लादायचे नव्हते. त्यामुळेच आदित्यने विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली, त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते बुधवारी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी पत्रकारांनी त्यांना आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीविषयी प्रतिक्रिया विचारली. तेव्हा उद्धव यांनी म्हटले की, बाळासाहेबांनीही मला मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही, असे सांगितले होते. परंतु, मी तुला अडवणार नाही. तू स्वत:चे काम करत राहा, शिवसैनिकांनी स्वीकारले तर पुढे जाशील, असा सल्ला त्यांनी मला दिला होता. 


आदित्यच्याबाबतीतही मी हेच केले. मला कोणावरही दडपण येऊन द्यायचे नव्हते म्हणून मी आदित्यने निवडणूक लढवण्याची घोषणा केली, तेव्हा मी उपस्थित नव्हतो. आदित्य मनापासून शिवसेनेचे काम करत आहे. शिवसैनिकांनीही त्याला आनंदाने स्वीकारले आहे. आता त्याची जबाबदारी शिवसैनिकच घेतील, उद्धव यांनी सांगितले. 


दरम्यान, यावेळी उद्धव यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलायला नकार दिला. येत्या ८ तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्यात मी सर्व गोष्टींवर सविस्तरपणे बोलेन, असेही उद्धव यांनी सांगितले. 


आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वरळीतील मेळाव्यात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. त्यासाठी सेनेकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरु होती. काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर वरळीचे आमदार सुनील शिंदे आणि इतर स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली होती. यामध्ये आदित्य यांना वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासंदर्भात अंतिम चाचपणी झाली होती. अखेर त्यांना वरळीतून निवडणुकीला उभे करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते.