मुंबई : युतीच्या मनोमिलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. लोकसभेपूर्वी वरळी येथील हॉटेलमध्ये अमित शाहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी युती जाहीर केली आहे. सर्वांच्या साक्षीनं पुढची युती कशी होईल हे त्यांनी सांगितल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे या चर्चेला अर्थ नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे शिवसेनेबरोबर युती कराच असे स्पष्ट आदेश भाजप अध्यक्षांनी दिले आहे, पण भाजपासमोरचा मोठ्ठा प्रश्न आहे. तो २८८ मध्येच मित्रपक्षांसह जागावाटपाचं भागवायचं कसं. 


विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात मित्रपक्ष भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. मित्र पक्षांच्या अवास्तव मागण्या लक्षात घेता मित्रपक्षांचं कोडं भाजपा कसं सोडवणार, यावर भाजपची विधानसभा निवडणुकीतली वाटचाल अवलंबून असणार आहे


भाजपाने गेले काही दिवस स्वतंत्रपणे मित्र पक्षांशी चर्चा करायला सुरुवात केली आहे. पडद्यामागून तर शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा केव्हाच सुरु झाल्याचा भाजपचा दावा आहे. भाजप यावेळेही शिवसेनेबरोबर मित्र पक्षांना शेवटपर्यंत खेळवणार अशी चर्चा रंगते आहे.


जागावाटप कसंही होणार असले तरी भाजप मात्र सर्वात जास्त जागा मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकतं आहे. त्यामुळे सर्वात जास्त जागा जिंकत पुन्हा एकदा शिवसेना आणि मित्रपक्षांवर दबाव टाकणे भाजपला भविष्यात सोपे जाणार आहे. असं असलं तरी पक्षातच वाढलेली इच्छुकांची गर्दी, इतर पक्षांतलं इनकमिंग आणि मित्रपक्षांची वाढलेली जागेची मागणी यामुळे भाजपला युतीचा पेपर अवघड जाणार आहे.