Sharad Pawar Resignation : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घालत त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र शरद पवार यांनी याला नकार देत त्यांनी गठीत केलेल्या समितीच्या आधारे आता राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, राहुल गांधी, एमके स्टॅलिन यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा असे म्हटलं आहे. या निर्णयानंतर महाविकास आघाडीचं (MVA) भवितव्य काय अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray( यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयावर भाष्य केले आहे. "प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावं हे करण्याचा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना अधिकार असतो. अध्यक्षांच्या बाबतीत निर्णय होऊ द्या त्यानंतर मी बोलेल. महाविकास आघाडीला तडा जाईल अशी राष्ट्रवादीमध्ये घडेल असे मला वाटत नाही, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या  त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये उद्धव ठाकरेंनी फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणं आपल्याला आवडलं नसल्याचा उल्लेख केला आहे. त्याबाबही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. "प्रत्येकाला आत्मचरित्र लिहीण्याचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य वाटतो. याच्यापलीकडे यावर बोलणं योग्य नाही," असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.


तुम्ही या निर्णयानंतर शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली का असे विचारले असता उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "त्यांची पक्षांतर्गत घडामोड आहे त्यामुळे त्यांना अधिकार आहे मनाप्रमाणे करण्याचा. कार्यकर्त्यांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे ते सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेतील. मी त्यांना सल्ला कसा देणार?  मी दिलेला सल्ला पचनी पडला नाहीतर काय करु?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


महाविकास आघाडीला तडा जाईल असं काही करणार नाही - उद्धव ठाकरे


"महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची काळजी मी घेईन. तसं मी काही बोलणार नाही किंवा करणारही नाही. पण देशात हुकुमशाही येणार नाही असं मानणाऱ्या लोकांची एकता व्हायला हवी. मी व्यक्तीचा पराभव करायला मागत नाही, वृत्तीचा पराभव करायची इच्छा असते. त्यासाठीच हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं माझं म्हणणं आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.