मुंबई : सरकार जर जनतेसोबत नसेल तर, शिवसेना सरकारसबोत नव्हे तर, जनतेसोबत राहील, असे ठासून सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या रेट्यापुढे सरकार झुकले, असा टोला भाजप सरकारला लगावला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी बोलताना जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेनेने केलेल्या विविध मागण्यांना आणि आंदोलनाला यश आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तसेच, शिवसेनेने केलेल्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या, त्याबाबत सरकारचे आभारही मानले. ठाकरे म्हणाले, राज्यातील अंगनवाडी सेविकांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा होता. शिवसेना या अंगनवाडीसेविकांच्या पाठीशी खंबिरपणे उभी राहीली. त्यामुळे त्यांचे आंदोलन यशस्वी झाले. अंगनवाडी सेविकांना न्याय मिळाला. मुंबईतील फेरिवाल्यांना हटविण्याबाबतही शिवसेनेने सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यालाही यश आल्याचे उद्धव यांनी सांगितले.


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत केंद्रातील मोदी सरकारला चांगलेच फटकारे लगावले. सरकारने जीएसटी करात कपात केली. सरकारचा हा निर्णय दिवाळीची भेट असल्याचे चित्र उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण, ही दिवळीची भेट नव्हे तर, जनतेच्या रेट्यापुढे सरकारचा झालेला नाईलाज आहे. भाजप सरकारविरोधात सुरूवातीला लोक बोलत नव्हते. पण, आता जनतेच्या मनात सरकारबद्धल असंतोष निर्माण होऊ लागला आहे. हा असंतोष प्रकटही होताना दिसतो आहे. सरकारने वेळीच सावध होऊन जनतेच्या भावनांची कदर करावी. अन्यथा या असंतोषाचा भडका उडायला वेळ लागणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.



दरम्यान, पत्रकारांनी नारायण राणे यांनी केलेल्या टीकेबद्धल विचारायचा प्रयत्न केला. पण, उद्धव ठाकरे यांनी राणेंना अनुल्लेखाने मारणेच पसंत केले. मात्र, राणे यांच्या नव्या पक्षाबाबत विचारले असता, आजची पत्रकारपरिषद ही देशातील जनतेच्या जीवनमरणासाठी मी घेतली आहे. कोणाच्याही व्यक्तिगत जीवनमरणासाठी आजची पत्रकार परिषद नाही, असे म्हणन राणेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.