मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला विचारणा केल्यानंतर कालपासून मुंबईत वेगवान राजकीय हालचाली सुरु आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सत्तास्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे महत्त्वाच्या भेटीगाठी घेत आहेत. काहीवेळापूर्वीच त्यांनी वांद्र्यातील ताज लँडस एन्ड हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर उद्धव यांनी फोनवरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देणार का, अहमद पटेल यांची महत्वाची भूमिका?


त्यामुळे काँग्रेस शिवसेनेला अखेरच्या क्षणी का होईना पाठिंबा देईल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजपचे महत्त्वाचे नेते दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात याठिकाणी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होईल. त्यावेळी भाजपकडून पुढील रणनीती ठरवण्यात येईल. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादवही उपस्थित आहेत. 


भाजपला समर्थन देणारे दोन अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात



दरम्यान, सध्या सोनिया गांधी फोनवरून जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेस आमदारांशी बोलत आहेत. त्या प्रत्येक आमदाराची भूमिका जाणून घेत आहेत. यापैकी बहुतांश आमदारांनी शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे आता सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास राजी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सोनियांनी शिवसेनेला पाठिंबा नाकारला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भीती आहे. परंतु, काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेवर भलतेच ठाम आहेत. त्यामुळे मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली आहे.