मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी उद्धव यांच्यासोबत शिवसेनेचे १८ खासदारही उपस्थित असतील. हे सर्वजण रामजन्मभूमीस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. त्याचवेळी म्हणजेच रविवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नक्की कुठे जाणार? नियोजित अयोध्या दौरा करणार की शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत अगोदरच अयोध्येत पोहोचले आहेत. दुसरीकडे अयोध्येत दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अयोध्येत हालअलर्ट जारी करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या सकाळी ११ वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार उरकण्याच्यादृष्टीने ही लगबग सुरु आहे.


आज सकाळपासून मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार, याविषयी बरेच तर्कवितर्क लढवले जात आहे. 'झी २४ तास'ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी पाच नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी दिली जाईल. मात्र, यासाठी पाच विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचे सांगितले जाते. यामध्ये प्रकाश मेहता, प्रवीण पोटे, विद्या ठाकूर, गडचिरोलीचे पालकमंत्री अंब्रीश आत्राम, विष्णू सावरा आणि बबनराव लोणीकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. हे सर्व मंत्री आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे देण्याची शक्यता आहे.