उद्धव ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्त्वाची कास सोडणार नाहीत- रणजीत सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून ते सत्तेसाठी माघार घेतील असे वाटत नाही.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्त्वाची कास सोडणार नाहीत, असे मत स्वातंत्र्यवीर सावकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी त्यांना शिवसेनेने राज्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी केलेल्या हातमिळवणीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली.
या प्रश्नाला उत्तर देताना रणजीत सावरकर यांनी म्हटले की, मी उद्धव ठाकरे यांना जितके ओळखतो, त्यावरून ते हिंदुत्त्वाची विचारधारा सोडतील, असे वाटत नाही. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून ते सत्तेसाठी माघार घेतील असे वाटत नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की, शिवसेना काँग्रेसला हिंदुत्त्वाविषयीची भूमिका बदलायला भाग पाडेल, असे रणजीत सावरकर यांनी सांगितले.
मनमोहन सिंगांचे 'ते' विधान म्हणजे काँग्रेसचा दुटप्पीपणा- रणजीत सावरकर
राज्यातील सत्तास्थापनेवरून झालेल्या संघर्षानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाले आहे. भाजपने मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याची मागणी नाकारल्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला होता.
परिणामी युतीला बहुमत मिळूनही राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. सध्या शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेची बोलणी सुरु आहेत. यासाठी शिवसेनेने केंद्रातील भाजप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाही (एनडीए) सोडचिठ्ठी दिली होती.
'संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे गोबेल्स; शिवसेनेला पुन्हा NDA त स्थान नाही'