मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला एसटीचा संप मिटण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी केलेय. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोनवरून चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांचा आज संप मिटण्याची शक्यता वर्तविण्यात येता आहे. संप मिटल्यानंतर संघटनांचे कर्मचारी, नेते वर्षावर आणि मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचे सांगण्यात आलेय.


संपामुळे एसटी स्थानके ओस पडू लागली आहेत तर रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नाही अशी स्थिती झाली आहे. प्रशासनाने प्रवाशांची गरसोय टाळण्यासाठी खासगी वाहने, बसेस अधिगृहित करण्याचे गुरुवारी आदेश दिले. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले.


राज्यातील एसटी संपाचा ताण आता रेल्वे सेवेवर आलाय. एसटी गाड्या नसल्याने लोकांनी रेल्वेचा आसरा घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने संपामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहून जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला.


लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरू मत्स्यगंधा एक्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मंगळुरू जं. मंगलोर एक्प्रेस आणि दादर-सावंतवाडी तुतारी एक्प्रेसला जादा अनारक्षित डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे.