शिवसेनेची भूमिका काँग्रेसला छेद देणारी, मुख्यमंत्र्यांचे एका दगडात तीन पक्षी !
सध्या देशात CAA आणि NRC या मुद्द्यावरुन जोरदार वातावरण तापले आहे. यातच उद्धव ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे.
मुंबई : सध्या देशात CAA आणि NRC या मुद्द्यावरुन जोरदार वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी याला विरोध होत आहे. तर भाजपकडून दोन्ही मुद्द्यांचे समर्थन केले जात आहे. भाजपकडून जनप्रबोधन करण्यात येत आहे. त्याचवेळी विरोधकांकडून मोर्चे काढून आणि आंदोलन करुन याला तीव्र विरोध करण्यात येत आहे. काँग्रेस राज्यात या दोन्हींना तीव्र विरोध होत आहे. मात्र, महाराष्ट्रात सध्या शिवसेनेची भूमिका काँग्रेसला छेद देणारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीएएला पाठिंबा दिला आहे. मात्र एनआरसीला स्पष्ट विरोध केला आहे. असे करुन उद्धव ठाकरेंनी नेमकं काय साधले आहे.?
राजस्थान, मध्ये प्रदेश, छत्तीसगढ, पंजाब, केरळ, पाँडिचेरी या काँग्रेसशासित राज्यांचा विरोध आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. पण इथे शिवसेनेची भूमिका काँग्रेसला छेद देणारी आहे. या भूमिकेनंतर काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. त्यावर काँग्रेस म्हणत आहे, मतभेद असतील तर मिटवू.
सीएएला पाठिंबा आहे, एनआरसीला स्पष्ट विरोध
तूर्तास एनआरसी नाही, हे मोदी सरकारने मंगळवारीच लोकसभेत स्पष्ट केले आहे. त्यातच सीएएला पाठिंबा देणारे सरकार हवे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ही भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांनी एका दगडात तीन पक्षी मारलेत.
१. माझा पक्ष आणि माझ्या भूमिकांवर मी ठाम राहणार, हा इशारा दोन सत्ताधारी पक्षांना दिला
२. पाकिस्तानी. बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून लावण्याची भाषा राज ठाकरे करत असताना, NRC ला ठामपणे विरोध करत मनसेच्या मुद्द्यातली हवा काढली.
३. मोदी सरकारने आणलेल्या सीएएला पाठिंबा देत भाजपबरोबर सलोख्याची एक विंडो ओपन ठेवली आहे.
राज्यात सीएए लागू होणार का, यासंदर्भातले पत्ते आता खुले झालेत. आता सत्तेत असणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये यावरुन सामना रंगणार का, याची उत्सुकता आहे.