रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale) शिवरायांबद्दल (Chatrapati Shivaji Maharaj) अवमानजनक विधानं करणाऱ्यांची मुंडकी छाटा असं विधान काहीच दिवसांपूर्वी  केलं होतं. याचप्रकरणात त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पण मोदींच्या भेटीनंतर उदयनराजे एकदम मवाळ झाले. नेमकं काय झालं. (udyanaraje bhosale backfoot after meet pm narendra modi over to bhagatsingh koshyari controversial statment)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांची मुंडकी छाटण्याची भाषा उदयनराजे काही दिवसांपूर्वी करत होते. पण उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांची भाषाच बदलली. 



राज्यपाल आणि इतर नेत्यांनी शिवरायांसंबंधी केलेल्या अवमानजनक विधानांसंबंधी उदयनराजेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, आपलं म्हणणं मांडलं पण पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उदयनराजे पूर्णपणे मवाळ झालेले पाहायला मिळाले. एका व्यक्तीच्या चुकीच्या विधानामुळे संपूर्ण पक्षाला दोष देता येणार नाही, असं उदयनराजेंनी म्हटलं. 


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्यांच्या मालिकेसंबंधी उदयनराजेंनी पंतप्रधान कार्यालयाला आणखी एक पत्र दिलं. आता पुढील कारवाई प्रक्रियेनुसार होईल असं त्यांनी म्हटलंय. पण काहीच दिवसांपूर्वी मुंडकी छाटण्याची भाषा करणारे उदयनराजे अचानक इतके मवाळ का झाले, मोदींकडून त्यांना कोणतं ठोस आश्वासन मिळालंय का, राज्यपालांवर पुढच्या काही दिवसातच कारवाई होईल असं आश्वासन मिळाल्यामुळेच उदयनराजे मवाळ झाले का अशा चर्चांना उधाण आलंय.