चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेला जीवनदान दिलंय. अवघड अशी शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी महिलेचा जीव वाचवलाय. डॉक्टरांनी या महिलेच्या पोटातून तब्बल अर्धा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मासाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढला आहे. डॉक्टरांच्या या प्रयत्नांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला या महिलेच्या पोटात वारंवार दुखत होतं. मात्र हे कशामुळे होतंय ते महिलेला कळत नव्हतं. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महिलेला खासगी रुग्णालयात उपचार परवडत नव्हतं. यामुळे महिलेने हे दुखने बरेच दिवस अंगावर काढले. मात्र त्रास असह्य झाल्याने महिलेने थेट उल्हासनगरचे मध्यवर्ती शासकीय रुग्णालय गाठलं. 


महिलेची सोनोग्राफी केल्यावर तिच्या पोटात पाण्याच्या मासाचा गोळा असल्याचं डॉक्टरांना निष्पन्न झालं. त्यानंतर उल्हासनगर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी अडीच तास शस्त्रक्रिया करत या महिलेच्या पोटातून अर्धा किलोचा गोळा बाहेर काढलाय. विशेष म्हणजे दुर्बिणीच्या सहाय्याने अवघे तीन टाके टाकून महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केलीय. खाजगी रुग्णालयात ज्या शस्त्रक्रियेला लाखो रुपये लागतात ती शस्त्रक्रिया उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात मोफत झाल्याने महिलेने डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत.


"शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन गाठ असल्याचे समोर आलं. पुढे जाऊन काही त्रास होऊ नये यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासाठी दीड ते दोन तास लागले. लॅप्रोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णाने माझ्यावर विश्वास ठेवला," अशी प्रतिक्रिया रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.


"मध्यवर्ती रुग्णालयात अशा प्रकारच्या अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यासाठी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च येतो. रुग्णाला पोटात मोठी गाठ होती. ती अर्ध्या किलो वजनापेक्षा जास्त असू शकते. सोनोग्राफीमध्ये ती मोठी दिसत होती.  लॅप्रोस्कोपीद्वारे तीन टाक्यांमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली," अशी माहिती डॉक्टरांनी दिली.