मुंबई : रस्त्यावर सिग्नल जवळ लहान मुलं कधी गाडी पुसायला तर कधी काही विकताना आपण पाहिले आहेत. असाच एक सिग्नलवरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधून एक अनोखी गोष्ट आपल्यासमोर आली आहे. (Unbelievable act of kidness has been captured with a video and it will melt your heart )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिग्नल लागताच गाड्या थांबल्या. जवळचा एक छोटा मुलगा एका गाडीजवळ येतो. त्याला या लहान वयात परिस्थितीमुळे गाडी पुसण्याचं काम करावं लागत असतं. त्याच्या हातात एक फडकं दिसून येतं. गाडी पुसणार एवढ्यात गाडीच्या मागील बाजूची एक खिडकी उघडली जाते. त्यातून एक लहान मुलगा डोकावत असतो. 


दोन्ही समवयस्क मुलं पण दोघांच्या परिस्थितीतील तफावत सरळ सरळ कळून येते. पण पुढच्या काही सेकंदात जे घडतं त्यामुळे ही तफावत नाहीशी झाली की काय असं वाटू लागतं. कारण त्या गाडीतील मुलगा या दुसऱ्या मुलाला आपल्या हातातली खेळण्यातली एक छोटी गाडी काढून देतो. मग रस्त्यावर उभा असलेला हा मुलगा ही गाडी चालवून बघतो. 



तेवढ्यात गाडीतला मुलगा त्याला थोडीशी मोठी गाडी खेळण्यातला जे सी बी काढून देतो. हा मुलगा ही गाडीही चालवून बघतो. मग खऱ्या गाडीच्या खिडकीच्या कडांवर हे दोघेही गाड्या चालवतात. मग मात्र रस्त्यावरचा हा छोट्या त्याच्या हातातली जे सी बी चं खेळणं गाडीतल्या मुलाला पुन्हा देऊ करतो.


पण आतला मुलगा मात्र ते नाकारतो. हाताने दोनदा नकार देत ह्या खेळण्यातल्या गाड्या तो या मुलाला देऊन टाकतो. आपल्या मनात त्या मुलाविषयी कौतुक दाटून येतं. पण हे सगळं फुकट कसं घ्यायचं हे त्या रस्त्यावरच्या मुलाला वाटलं असावं. आम्ही असं म्हणतो कारण हा मुलगा मग कुठे तरी जातो आणि या गाडीतल्या मुलासाठी काही तरी खायला घेऊन येतो. मग दोघेही मिळून तो खाऊ खातात.