मुंबईच्या विकास आराखड्यात कोळीवाड्याबद्दल अस्पष्टता
कोळी बांधव आक्रमक
मुंबई : आमचा पुनर्विकास आम्ही स्वतःच करू. एसआरए क्लस्टर यासह कुठलीच योजना आम्हाला नको अशी भूमिका मुंबईतल्या कोळीवाड्यात राहणाऱ्या कोळी बांधवानी घेतली आहे. येणाऱ्या योजना या आम्हा मूळ मुंबईकरांना उध्वस्त करणाऱ्या आहेत त्यामुळे स्वतःचे कोळीवाडे वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका कोळी बांधवानी जाहीर केली आहे.
मुंबईचे मूळ रहिवासी म्हणजे कोळी बांधव... मुंबईच्या समुद्र किनाऱ्या लगत या कोळी बांधवांचे 40 हुन अधिक कोळीवाडे आहेत. वर्षानुवर्षे हे कोळी बांधव या ठिकाणी राहतातय आणि परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करतातय. यातील अनेकांनी आता काळा नुसार इतर ही उद्योग नोकरी करण्यास सुरवात केली आहे. यांची कुटुंब ही आता वाढू लागली आहेत.त्यामुळेच सतावू लागला आहे घरांचा प्रश्न आणि आहेत या घरांच्या पूर्णविकासाचा प्रश्न.
मुंबईचा विकास आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला आहे मात्र या मध्ये कोळीवाड्या बद्दल सुस्पष्टता नाही. त्यामुळे गावठाण विस्तार कायद्या अंतर्गत गावाच्या परिघा बाहेरील शेवटच घर ही अंतिम सीमा पकडून गावाच सीमांकन व्हाव,अशी अपेक्षा कोळी बांधवांची आहे.शिवाय प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड द्यावे,जो पर्यंत कोळी वाड्यांचे सीमांकन होत नाही प्रॉपर्टी कार्ड बनत नाहीत तो पर्यंत विकास आराखडा मंजूर होऊ नये अशी मागणी कोळी बांधवांकडून केली जाते आहे.
मासेमारीपासून कोळी वाड्याच्या पुनर्विकासापर्यंत अनेक समस्या सध्या कोळी बांधवांसमोर आ वासून उभ्या आहे. बांधकाम व्यवसायिकांना भल्यासाठी कोळी वाडे उध्वस्त करण्याचा सरकारचा डाव असल्याचा ही आरोप होतो आहे. त्यामुळे आमचे कोळीवाडे आम्हीच विकसित करू अशी भूमिका या कोळी बांधवानी घेतली आहे. महत्वाच म्हणजे आम्हाला कोणीच वाली नाही अशी भावना आज कोळी बांधवांची झाली आहे. कोळी समाज ही मुंबईची शान आहे अस सांगणारे, कोळी समाजाचे कैवारी आम्हीच असल्याचं दाखवणारे राजकीय पक्ष आणि पुढारी आता याची दखल घेणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.