मुंबई : मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या भुयारी मेट्रो ३ च्या प्रत्यक्ष कामाला म्हणजे प्रत्यक्ष बोगदे बनवण्याच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे. मेट्रो ३ चा मार्ग कुलाबा ते सीपझ असा ३३ किमीचा भुयारी मार्ग असणार आहे. जमिनीपासून सुमारे २५ मीटर खोलीवर या मेट्रो चा मार्ग असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी आत्तापर्यंत ३ भुयारी मार्ग तयार करणारे टनेल बोअरिंग मशिन्स हे जमिनीखाली उतरवण्यात आले आहेत. यापैकी माहीमच्या नयानगर इथले मशीन आज प्रत्यक्ष बोगदे बनवण्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. माहीमच्या भागातील हे मशीन हे दादर शिवाजी पार्कपर्यंत भूमिगत बोगदे बनवण्याचे कामे करणार आहे. 


अशी एकूण १७ अवाढव्य टनेल बोअरिंग मशिन्स ही जमिनीखाली बोगदे बनवण्याचे काम पुढील २ वर्षे करणार आहेत. मेट्रो ३ चा मार्ग २०२१- २२ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचं हा प्रकल्प राबवणा-या MMRDA च्या मुंबई मेट्रो रेल विकास कॉर्पोरेशननने सांगितले आहे. 


मेट्रो ३ मार्गामुळे कफ परेड, नरिमन पॉईंट, काळबादेवी, वरळी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, सीपझ ही आर्थिक उलाढालीची केंद्र जोडली जाणार आहेत. तर रेल्वेने जोडली न गेलेली वरळी, प्रभादेवी, धारावी, कलिना, विमानतळसारखे भाग जोडले जाणार आहेत. तसंच सीएसटी, चर्चगेट, दादर सारखी रेल्वे स्टेशन्स मेट्रो ने जोडली जाणार आहेत.


प्रशासनाला न्यायालयाचा दणका -


मेट्रो- ३ वरून प्रशासानाला आज उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा फटकारलंय. रात्रीचं काम बंद झालं नाही, तर मात्र संपूर्ण काम बंद करण्याचे आदेश द्यावे लागतील असा इशाराच आज हायकोर्टानं मेट्रो ३ च्या प्रशासानाला दिला. मेट्रो 3चं काम रात्री बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण याचिका कर्त्यांनी रात्रीही काम सुरूच असल्याची तक्रार केली. त्यावर कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली. काम सुरू असताना आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत असल्याचं मेट्रोचं काम रात्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.