राज ठाकरे आरोपी नंबर 1, पाहा कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेतल्या सभेतील भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमं लावण्यात आली आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेतल्या सभेतील भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमं लावण्यात आली आहेत.
औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एफआयआरमध्ये राज ठाकरेंना आरोपी नंबर एक करण्यात आलं आहे.
अटींचं उल्लंघन
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेसाठी पोलिसांनी 16 अटी ठेवल्या होत्या. त्यातल्या काही अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमवली असा ठपका ठेवण्यात आला आहे.
कोणती कलम लावण्यात आली
राज ठाकरे यांच्यावर कलम 116, 117, 153 भादवि 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 या कलमांतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोणत्या कलमात कोणते गुन्हे?
116 - गुन्हा करण्यासाठी मदत करणं
117 - गुन्ह्याला मदत करणं आणि चिथावणीखोर भाषण
135 - अटि शर्थींचा भंग करणं
153 - दोन समूहात भांडण लावणे
सरकारवर पोलिसांचा दबाव?
सरकारचा पोलिसांवर दबाव असल्यानं राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. सभेसाठी मुद्दाम पाळता न येण्यासारख्या अटी लादल्या होत्या. उद्धव ठाकरे, पवारांच्या सभांना उपस्थितीची मर्यादा कधी लावली का, असा सवालही देशपांडे यांनी केलाय. गुन्हा दाखल होणार, हे माहिती होतंच, असंही ते म्हणाले.
मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई
मनसे पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करायला सुरूवात केलीय. मुंबई सर्वात आधी भोंग्यावर हनुमान चालिसा वाजवणारे चांदिवलीचे मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी खबरदारी म्हणून ताब्यात घेतलंय. तसंच त्यांच्या ऑफिसमधून पोलिसांनी भोंगेही जप्त केले आहेत.