भावासोबत जीवदानी देवीच्या दर्शनाला गेला आणि... 19 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
19 वर्षीय सोनू दादर येथून आपल्या भावासह विरार येथे जीवदानी देवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्याने मंदिराकडे जाणाऱ्या 200 पायऱ्या देखील पार केल्या मात्र त्यानंतर खाली कोसळला
प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : गेल्या काही दिवसांपासून आकस्मिक मृत्यूंचा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जीम करताना अनेकांना मृत्यूने गाठल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. त्यामुळे वर्कआऊट (Gym Workout) करताना अनेकदा योग्य काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. अशावेळी आलेला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा अनेकदा मृत्यचं कारण बनला आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटक्याचे प्रमाण वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. असाच काहीसा प्रकार विरारच्या जीवदानी मंदिरात (virar jivdani mandir) समोर आलाय.
जीवदानी मंदिरात पायऱ्या चढताना एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जीवदानी देवीच्या दर्शनासाठी जात असतानाच 19 वर्षाच्या तरुणाला मृत्यूने गाठलं आहे. तरुणाच्या अकाली निधनानंतर सर्वानांच धक्का बसला आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
विरार येथील जीवदानी देवीच्या दर्शनासाठी पायी डोंगर चढणाऱ्या एका 19 वर्षीय मुलाचा धाप लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नायगाव-दादर येथे राहणारा सोनू जयस्वाल नावाचा तरुण आपल्या मोठ्या भावासोबत शुक्रवारी विरारमधील जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आला होता. दुपारी दोनच्या वाजताच्या सुमारास पायरी मार्गावरून जाताना हा सर्व प्रकार घडला.
200 पायऱ्या चढून झाल्यावर सोनूला दम लागला. त्यानंतर तो चक्कर येऊन जागीच बेशुद्ध पडला. यानंतर सोनूला तात्काळ विरार पश्चिमेच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर सोनूच्या भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. दरम्यान विरार पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.