Devendra Fadnavis Office : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मंत्रालयातील या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तोडफोड करणारी ही महिला मंत्रालयात पास न घेता शिरली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अज्ञात महिलेने सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात प्रवेश केला. त्यानंतर या महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात जाऊन तिथे तोडफोड केली. तोडफोड केल्यानंतर ती महिला तेथून निघून गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, मंत्रालयातील तोडफोड करतानाची संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत युद्धपातळीवर त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 


अज्ञात महिलेचा पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास


मंत्रालयातील या घटनेमुळे सुरक्षाबाबतच्या गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. गुरुवारी रात्री ही महिला मंत्रालयाच्या परिसरात होती. परिसरातील पोलीस बंदोबस्ताचा अंदाज घेत ही महिला सचिवांच्या गेटने मंत्रालयात शिरली. यानंतर या महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेरच्या वस्तूची तोडफोड केली. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नेमप्लेट देखील काढून बाहेर फेकली. त्यानंतर या अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तिथे घोषणाबाजी केली. 


मंत्रालयातील सुरक्षेत चूक?


मात्र, मंत्रालयात तोडफोड करणारी ही महिला कोण आहे हे अद्याप समजले नाही. सध्या पोलीस देखील या महिलेचा शोध घेत आहेत. परंतु, ही महिला सुरुक्षा असून देखील मंत्रालयामध्ये कशी आली? त्याचबरोबर ती विना पास कशी शिरली? असा प्रश्न देखील विचारले जात आहेत. मात्र, यावर प्रश्नावर अद्याप कोणी उत्तर दिलेले नाही. या संपूर्ण घटनेचा तपास मरिन ड्राईव्ह पोलीस करत आहेत. आता पोलिसांच्या तपासातून कोणती माहिती समोर येते. हे बघावे लागेल.