मुंबई : विनापरवानगी मंडप उभारलेल्या गणेश मंडळांविरोधात मुंबई महानगरपालिकेने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केलीय. मुलुंड इथल्या पालिकेच्या टी वॉर्डमधील अशा नऊ गणेश मंडळांवर पालिकेने कारवाईचा बडगा उचललाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातील काही गणेश मंडळांना मंडप तात्काळ रिकामं करा अन्यथा पालिका कारवाई करेल अशी नोटीस बजावण्यात आली. यामुळे गणेश मंडळांमध्ये तणाव वाढला होता. मात्र मुलुंड पोलिसांनी वेळीच दखल घेत मंडळांना पर्यायी जाग देत गणेश मूर्ती हलवण्याचं आवाहन केलं. पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत काही मंडळांनी गणेशमूर्ती हलवण्यास सहमती दर्शवली आणि या वादावर पडदा पडला.


मुंबई शहरात एकही मंडप बेकायदेशीर नसल्याचा दावा पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात केला. बेकायदेशीर मंडपांविरोधात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान पालिकेने ही माहिती दिलीये. विशेष म्हणजे याच पालिकेने गेल्या सुनावणीत मुंबई शहरात १३२ मंडप अनधिकृत असल्याचं सांगितलं होतं. गेल्या सुनावणीत देण्यात आलेले आकडे चुकीचे असल्याचा निर्वाळा शुक्रवारी पालिकेने न्यायालयात केला. या घडीला पश्चिम उपनगरात २६४ बेकायदेशीर मंडप आहेत. त्यातील वीस मंडपांवर कारवाई केली असून १० मंडपांवर कारवाई सुरू असल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं. यावेळी बेकायेशीर मंडपांबाबतची यादी नव्याने कोर्टात सादर केली.


कोल्हापुरात १५२ मंडप, मिरा भाईंदरमध्ये ३१ अनधिकृत मंडप आहेत. कोणत्याही पालिकेने बेकायदेशीर मंडपांना परवानगी दिली असेल तर ते खपवून घेणार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. न्यायालयाच्या आदेशानंतरही पालिका प्रशासन बेकायदेशीर मंडपांना परवानगी देत असेल तर पालिका आयुक्तांवर अवमानाची कारवाई करु असा इशारा न्यायालयाने दिलाय. याप्रकरणी पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला होणार आहे.