नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पटेल यांच्या राजीनाम्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयातील उच्चपदस्थांमध्ये आर्थिक धोरणांच्या मुद्द्यावरून सातत्याने वाद सुरू होते. तेव्हापासूनच उर्जित पटेल आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. मात्र, उर्जित पटेल यांनी आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी काम करायला मिळणे ही माझ्यासाठी भूषणावह आणि सन्मानाची बाब होती, असे पटेल यांनी सांगितले. 



उर्जित पटेल यांनी राजीनामा देताना रिझर्व्ह बँकेतील सहकारी व कर्मचाऱ्यांचे आभारही मानले. गेल्या काही काळात रिझर्व्ह बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच संस्थेला आपल्या उद्दिष्टे पूर्ण करता आली. भविष्यातही रिझर्व्ह बँकेने अशाप्रकारे वाटचाल सुरु ठेवावी, असे पटेल यांनी सांगितले. उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर होते. रघुराम राजन पायउतार झाल्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये पटेल यांच्याकडे तीन वर्षांसाठी गव्हर्नरपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. २०१९ मध्ये त्यांचा कार्यकाळा संपुष्टात येणार होता. मात्र, गेल्या काही काळापासून रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयातील उच्चपदस्थांमध्ये सातत्याने खटके उडत होते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय आर्थिक निर्णय घेण्याच्या नादात सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाकयुद्धच पेटले होते. अखेर १९ नोव्हेंबरला रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता.