मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतउत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर आपलं नशीब आजमावून पाहिलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. काँग्रेसच्या वरिष्ठांना धाडलेलं आपलं खासगी पत्रं सार्वजनिक केल्यामुळे उर्मिला भडकलीय. या पत्रात उर्मिलानं आपल्या लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमुळेच आपला पराभव झाल्याचं म्हटलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील 'विश्वासघातामुळे' दुखावलेली उर्मिला दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्मिलाच्या जवळच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, उर्मिलाला भाजप आणि शिवसेनेकडूनही पक्षात प्रवेश करण्याची ऑफर मिळालीय... आणि त्यावर उर्मिला गंभीरतेनं विचारही करतेय. तर दुसरीकडे मनसेनंही उर्मिलाला हेरलंय. 


एक मराठी मुलगी, मुस्लीम पती आणि प्रसिद्ध अभिनेत्री या उर्मिलाच्या जमेच्या बाजू प्रत्येक पक्षासाठी 'व्हॅल्यू ऍडिशन' ठरू शकतात.


काँग्रेस नेत्यांना टाळलं...


दुसरीकडे, मुंबईच्या काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर उर्मिलानं पक्ष सोडणार असल्याचं निश्चित केल्याचंही म्हटलंय. उर्मिलानं काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे फोन टाळलेत. आता भविष्यात काय निर्णय घेणार हे उर्मिलाकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.



उर्मिलानं काय म्हटलं होतं आपल्या पत्रात


ज्यावरून हा सगळा वाद उभा राहिलाय, त्या मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना लिहिलेल्या पत्रात मातोंडकरने निरूपम यांचे निकटवर्तीय संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांच्यावर प्रचारात सहाय्य न केल्याचा आरोप केला आहे. समन्वय, कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे आणि साधन सामग्रीचा योग्य वापर यात स्थानिक नेतृत्व अपयशी ठरल्याची टीका मातोंडकरनं केली आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बोरिवलीत झालेली सभा अतिशय विस्कळीत स्वरूपात आयोजित झाल्यामुळे मानहानी झाल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलंय. कोंडविलकरांनी मातोंडकरच्या प्रचारासाठी कुटुंबीयांकडे पैशांची मागणी केल्याचाही आरोप त्यांनी केलाय. या दोघांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी मातोंडकरांनं आपल्या या पत्रात केल्याचं उघड झालंय.