लोकसभा निवडणुकीत मदत नाही, उर्मिला मातोंडकरचे पत्र उजेडात
मुंबई काँग्रेसमधल्या वादाला आता नवं वळण लागले आहे. उर्मिला मातोंडकरने तोफ डागणारं पत्र आता उजेडात आले आहे.
मुंबई : मुंबई काँग्रेसमधल्या वादाला आता नवं वळण लागले आहे. उत्तर मुंबईतून निवडणूक लढलेल्या उर्मिला मातोंडकरने संजय निरूपम गटावर तोफ डागणारं पत्र आता उजेडात आले आहे. १६ मे या दिवशीचं हे पत्र उघड झालेय. मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना लिहीलेल्या या पत्रात मातोंडकरने निरूपम यांचे निकटवर्तीय संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांच्यावर प्रचारात सहाय्य न केल्याचा आरोप केला आहे. समन्वय, कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे आणि साधन सामग्रीचा योग्य वापर यात स्थानिक नेतृत्व अपयशी ठरल्याची टीका मातोंडकरनं केली आहे.
या पराभवाला मातोंडकरच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आलेले कोंडविलकर आणि पाटील जबाबदार असल्याचं पत्रात म्हटलंय. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बोरिवलीत झालेली सभा अतिशय विस्कळीत स्वरूपात आयोजित झाल्यामुळे मानहानी झाल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलंय. कोंडविलकरांनी मातोंडकरच्या प्रचारासाठी कुटुंबीयांकडे पैशांची मागणी केल्याचाही आरोप त्यांनी केलाय. या दोघांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी मातोंडकरांनं आपल्या या पत्रात केल्याचं उघड झालंय.