मुंबई : मुंबईकरांनो जर आज लसीकरणासाठी बाहेर पडणार असाल तर असं करू नका. कारण मुंबईमध्ये लसीकरण बंद असणार आहे. लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबईतील सरकारी तसंच महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज बंद राहणार आहे. लसींचा साठा जश्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्यानुसार योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने माहिती दिली जाईल. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलंय.


गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये दररोज एक लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण करण्यात येतंय. सोमवारी आतापर्यंत सर्वाधिक लस दिल्याचा विक्रम नोंदविण्यात आला. या दिवशी 1 लाख 80 हजार लोकांना लस देण्यात आली. मुंबईत आतापर्यंत 53 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. मात्र आता पुम्हा एकदा अचानक लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे.


दरम्यान मुंबईप्रमाणे पुण्यातही आजच्या दिवशी लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. पुणे शहरातील महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे आज बंद राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात लसीकरणाने मोठा वेग घेतला होता, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी लसींच्या तुटवड्यामुळे लस केंद्र बंद ठेवावी लागली आहेत.