मुंबई : आपल्या वास्तवदर्शी विचारांनी अनेक नाटकांची निर्मिती करणारे ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुलुंड येथील रूग्णालयात त्यांचे निधन झाले. चारच दिवसां पूर्वी त्यांना छातीत दुखत होते. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री ८.३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, जावई आणि नात असा परिवार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवार मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीतील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. वामन तावडे यांनी सातत्याने वेगळा विषय घेऊन त्यातून सामाजिक प्रश्न मांडले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक नाटके लिहीली आणि त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.


तावडेंच्या 'छिन्न' मधून स्मिता पाटीलने व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. या नाटकाचे दिग्दर्शन सदाशिव अमरापूरकर यांनी केले. कन्स्ट्रक्शन, पिदी, मी घोडा हुसेनच्या चित्रातला, रायाची रापी आदी एकांकिका आणि छिन्न, इमला, रज्जू, चौकोन, तुम्ही आम्ही, कॅम्पस ही नाटके त्यांच्या लेखणीतून उतरली.