मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व संशोधन कायदा आणि NRC विरोधात आज महाराष्ट्र बंद पुकारलाय. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. बंद असला तरी मुंबईतल्या ९९ टक्के बेस्ट बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे बाहेर पडलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दादर आणि परिसरात सध्या सर्व काही सुरळीत सुरू आहे. या परिसरात बंदला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहिये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या बंदला साताऱ्यात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सर्व बाजारपेठा बंद आहेत. शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे मुलं घरी परतत आहेत. रिक्षा, बससेवाही बंद आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते नागरिकांना आवाहन करत आहेत.


औरंगाबादमध्ये देखील महाराष्ट्र बंदचे पडसाद दिसले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लोकांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं आणि केंद्राच्या नागरिकत्व कायद्याविरोधात घोषणाबाजी केली. 


नाशिकमध्ये बंदला फारसा प्रतिसाद मिळतांना दिसून येत नाही. शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीसह बंदला पाठिंबा देणाऱ्यांकडून निदर्शने केली जाणार होती. मात्र ती ही वेळेवर होत नसल्यानं समोरच असलेल्या व्यावसाययिकांनी आपली दुकानं खुली करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील इतर ठिकाणीही नेहमीप्रमाणे व्यवहार असल्याने बंदचा नाशिकमध्ये फारसा परीणाम दिसून येत नाहीये. 


वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यात सध्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोड, टिळक रोडवरची प्रतिष्ठां बंद आहेत. तर शहरात इतर भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. पण एनसीआर, सीएए, एनपीआर आणि आर्थिक डबघाईविरोधात बंद म्हणजे कर्फ्यू नव्हे, आम्ही जनतेला कैद केले नाही. हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवण्याचा आमचा उद्देश आहे अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. 


वंचित बहुजन विकास आघाडीच्या बंदचा नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अद्याप कुठलाही परिणाम झालेला नाही. विविध जिल्ह्यांतून तसंच राज्यांतून बाजारात भाजीपाल्याची आवक नेहमीप्रमाणे सुरु आहे. आवक वाढल्यानं भाज्यांचे दरही स्थिर आहेत.


आंबेडकरांच्या या महाराष्ट्र बंदच्या निर्णयाला ३५ संघटनांनी पाठिंबा दर्शविलाय. CAA कायदा देशभरात लागू झाला आहे. या कायद्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याती आली. अनेक ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं. संविधान विरोधी काम करून केंद्र सरकार नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता.