शरद पवारांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया...महाविकास आघाडीत `वंचित`ला...
Prakash Ambedkar Meet Sharad Pawar: राज्यातील हे दोन्ही महत्वाचे नेते एकामेकांचे राजकीय विरोधक मानले जातात. दरम्यान या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Prakash Ambedkar Meet Sharad Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची घडामोड समोर येत आहे. वंचिंत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसते अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा सुरु आहे. राज्यातील हे दोन्ही महत्वाचे नेते एकामेकांचे राजकीय विरोधक मानले जातात. दरम्यान या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आहे. वाय बी चव्हाण सेंटर येथे कार्यक्रम निमित्त प्रकाश आंबेडकर आले होते. त्यावेळेस स्टेजवर सुप्रिया सुळेही सहभागी होत्या. सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांना विनंती केल्यानंतर ते शरद पवार यांच्या भेटीस गेल्याचे वृत्त आहे.
पवार आणि आंबेडकर यांच्यातील राजकीय वाद कायम चर्चेत असतो. त्यातच या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या दोघांचा विरोधक भाजप आहे. महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी वंचितला सोबत घेतले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाला. त्यानंतर राष्ट्रवादीतून अजित पवार गट वेगळा झाला. यानंतर महाविकास आघाडी कमकुवत झाली. दरम्यान राज्यात वजाबाकीचे राजकारण होत असताना बेरजेचे राजकारण सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
'प्रॉब्लेम ऑफ रुपी'च्या माध्यमातून ब्रिटीश भारताला कसे लुटतात याची मांडणी बाबासाहेबांनी केली. रुपयाची किंमत स्थिर राहिली तर देशातला गरीबाची आर्थिक स्थिती बदलू शकते. या पुस्तकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने मी वक्ता म्हणून उपस्थित होतो. या कार्यक्रमानंतर आम्ही कॉफी प्यायलो. आम्ही 12 जण होतो. यावेळी शरद पवार उपस्थित होते. वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळेल का? यावर चर्चा झाली नाही. पाच राज्यांच्या निवडणूक होईपर्यंत यावर निर्णय होईल असे वाटत नाही. माझा भाजपला विरोध कायम राहील, असेही ते म्हणाले.
जरांगे पाटील यांच्याशी शासनाने इमानदारीने बोलावं. त्यांना अशी एक दिवस-दोन दिवस अशी मुदत देत राहू नये. गावागामध्ये कौटुंबिक, व्यक्तीगत समस्या सुरु आहेत. गावागावातील हा समाज आहे. सामाजिक अत्यंत वाईट परिस्थिती आहे. याचे गांभीर्य इथल्या राजकारण्यांना आलं नाहीय. त्यांनी फसवाफसवीचे राजकारण थांबवाव, असे ते म्हणाले.