शेतकरी संप आणि पावसामुळे भाज्या महागल्या
मुंबईत भाज्या महागल्या
नवी मुंबई : देशभरात शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यानं नवी मुंबईतील बाजारपेठेमधल्या भाजीपाल्यावर याचा परिणाम होण्याची चिन्ह आहेत. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 510 गाड्या दाखल झाल्या आहेत. नवी मुंबई भाजी बाजारपेठेत नाशिक आणि पुण्यातून भाजीपाला येत असतो. तसंच परराज्यातूनही भाजीपाला इथं आणला जातो. शनिवारी पुरेसा भाजीपाला आल्याने भाज्यांचे भाव स्थिर आहेत. शिमला, वाटाणे या भाज्यांचे भाव वगळता सर्व भाज्यांचे भाव स्थिर आहेत.
राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या संप आणि मान्सूनपूर्व पडलेला पाऊस या दोन्हींचा परिणाम मुंबईत दाखल होणाऱ्या भाजीपाल्यावर झाला आहे. संपामुळे दादर भाजी बाजारात नेहमीपेक्षा कमी भाजीच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. जर दहा दिवस संप सुरु राहिला तर भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.