देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, ठाणे : धावत्या ट्रेनच्या दारात लटकू नका असं आवाहन, रेल्वेकडून सतत केलं जातं. मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा रेल्वे मार्गादरम्यान, एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे. हा संपूर्ण थरारक प्रकार कळवा स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला. त्याआधारे पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. 


चालू लोकल गाडीतून दरवाज्यात किंवा खिडकीत असलेल्या प्रवाश्यांच्या हातातून मोबाईल लांबवणारी टोळी सक्रिय झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेत चेतन अहिरराव या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला. नाशिकमध्ये राहणारा चेतन १९ ऑगस्ट रोजी ठाण्यातल्या मित्राच्या वाढदिवसासाठी दिवा इथल्या आपल्या नातेवाईकांकडे आला होता. १९ ऑगस्टला मित्राचा वाढदिवस साजरा करुन, चेतन ठाण्याहून दिव्याला लोकलनं परतत होता. मध्यरात्री १२ वाजून ५४ मिनिटांनी कळवा रेल्वे स्थानकात आरोपीने चेतनच्या हातातील मोबाइलवर फटका मारला. मोबाईल हिसकवल्याचे लक्षात येताच चेतनने धावत्या लोकलमधून कल्याणच्या दिशेला फलाट संपल्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.