VIDEO : विधानसभेत चुकलेल्या आव्हाडांना जेव्हा अजित पवार सुधारतात...
शिरगणती सुरू असताना एक थोडं हटके चित्र विधानसभेत पाहायला मिळालं
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आहे. २८८ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत उद्धव ठाकरे सरकारच्या बाजूनं १६९ आमदारांनी मत दिलं. आधी आवाजी पद्धतीनं मतदान घेतलं गेलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिरगणतीद्वारे मतदान घेण्यात आलं. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकासआघाडीसह त्यांचे मित्रपक्ष मिळून एकंदर १६९ आमदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं. तर मनसे, माकप आणि एमआयम या तीन पक्षांचे मिळून एकंदर ४ आमदार तटस्थ राहिले. यावेळी, शिरगणती सुरू असताना एक थोडं हटके चित्र विधानसभेत पाहायला मिळालं.
शिरगणतीसाठी प्रत्येक आमदार उभं राहून आपलं नाव आणि एक-दोन-तीन असा क्रमवार अंक उच्चारत होता... यावेळी, एकनाथ शिंदे - एक, जयंत पाटील- दोन, छगन भुजबळ - तीन, बाळासाहेब थोरात - चार, नितीन राऊत - पाच, अजित पवार - सहा, धनंजय मुंडे - सात अशी शिरगणती सुरू झाली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपलं नाव सोळाव्या क्रमांकावर उच्चारलं... परंतु, ते आपला क्रमांकच विसरले... आणि त्यांनी 'जितेंद्र आव्हाड - क्रमांक वीस' असं म्हटलं... आणि विधानसभेत एकच हशा पिकला... यावेळी, जितेंद्र आव्हाड यांच्या समोरच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांनी जोरात 'सोळा... सोळा' ओरडून आव्हाडांना सुधारलं... दादांचा आवाज माईकमुळे ठळ्ळकपणे ऐकायलाही आला... त्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी गोंधळ थांबल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी आपलं नाव उच्चारलं.
बहुमत चाचणी दरम्यान भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि इतर आमदारांनी बहुमत चाचणीच्या आधी सभात्याग केला. यामुळे उद्धव ठाकरे सरकारविरोधात एकही मत नोंदवलं गेलं नाही. हा सुद्धा एक विक्रम सध्या कोणत्याच सभागृहाचे आमदार नसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर नोंदवला गेला.