मुंबई : मुंबईच्या भांडुपमध्ये एका क्रिकेटपटूचा खेळता खेळता मृत्यू झाल्याची घटना झालीय. वैभव केसरकर असं मृत खेळाडूचं नाव आहे. तो २४ वर्षांचा होता. धक्कादायक म्हणजे, गेल्या महिनाभरात अशाच पद्धतीनं तीन चिमुरड्यांनी खेळता-खेळताच आपला जीव गमावलाय. त्यांची 'अचानक' एक्झिट सगळ्यांना धक्का देऊन गेलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ डिसेंबरला भांडुपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत वैभव केसरकर खेळत होता. फलंदाजी करताना त्याच्या छातीत दुखू लागलं. तो डाव अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला परंतु छातीत दुखणं कमी झालं नाही. त्याला तात्काळ जवळच्या भावसार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी ईसीजी काढताच वैभवला 'कार्डियाक अटॅक' आल्याचं स्पष्ट झालं. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैभवच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसहित मित्रांनादेखील धक्का बसलाय. 


 


अधिक वाचा :- सीएम चषक स्पर्धेत नाचताना एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू, VIDEO


अधिक वाचा :- सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू, VIDEO


 


गेल्या महिन्याभरातील तिसरी घटना


मुंबईत महिनाभरात अशा प्रकारची तिसरी घटना घडल्यानं चिंता व्यक्त होतेय. कामाचा अतिताण, वाढत चाललेलं फास्ट फुड कल्चर, जेवणाच्या अनियमित वेळा, व्यायाम नसल्यामुळे तरुण वयात हृदयविकारानं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. 


२७ नोव्हेंबरला मुंबईतल्या कांदिवलीत सीएम चषक स्पर्देध नृत्य करताना एका १२ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला. अनिषा शर्मा असं या मुलीचं नाव होतं. नृत्य करत असताना तिला अचानक भोवळ आली आणि ती स्टेजवरच कोसळली. जागीच तिचा मृ्त्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाला होता. 


तर १४ डिसेंबरला रस्सीखेच खेळत असताना अचानकपणे महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना विद्याविहारमधील सोमय्या महाविद्यालयात घडली. जीबीन सनी असं त्या मुलांचं नाव होतं. रस्सीखेच सुरू असताना जीबीननं सर्वांच्या पुढे उभे राहत आपली ताकद लावली आणि रस्सीखेचचा दोर ही आपल्या मानेवर घेतला. मात्र, काही कळायच्या आताच जीबीन खाली कोसळला. तर २४ डिसेंबरला भांडुपच्या वैभव केसरकरला क्रिकेट खेळता खेळता छातीत दुखू लागलं अन् त्याचा मृत्यू झाला.