लोकमंगल दुधसंघ गैरव्यवहार प्रकरणावरुन विधानपरिषदेत गोंधळ
दुध संघाच्या मुद्दावरुन आज विधानपरिषदमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला.
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : सोलापूरमधील लोकमंगल मल्टिस्टेट कोऑपरेटीव्ह सोसायटी या दुध संघाच्या मुद्दावरुन आज विधानपरिषदमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. प्रश्नोत्तराच्या तासाला लोकमंगल मल्टिस्टेट कोऑपरेटीव्ह सोसायटीच्या भ्रष्ट्राचाराचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. संस्थेने निधीचा कोणताही गैरव्यवहार केला नसल्याची क्लिनचीटच दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देऊन टाकली. यावरुन विरोधकांनी संताप व्यक्त केला आणि गोंधळाला सुरुवात झाली.
लोकमंगल मल्टिस्टेट कोऑपरेटीव्ह सोसायटी या संस्थेच्या व्यवहाराबाबात लोकायुक्तांनी लक्तरे काढली असतांना आत्तापर्यंत नुसती चौकशी कशी चालू आहे, अटक का नाही असा प्रश्न विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. तर या संस्थेच्या भ्रष्ट्राचाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी शरद रणपीसे यांनी केली.
या प्रश्नावरुन गोंधळ वाढत गेल्यानं सभापती निंबाळकर यांनी पुढचा प्रश्न पुकारला. तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केल्यानं सभापतींनी विधानपरिषदचे कामकाज १० मिनीटाकरता तहकुब केले.