मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशीच निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जागांवर साटंलोटं
विधानपरिषदेच्या कोल्हापूर, धुळे-नंदूरबार आणि मुंबईतल्या दोन जागा बिनविरोध होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. पण नागपूर आणि अकोला-बुलडाण्यात थेट लढत होणार आहे. 


मुंबईत बिनविरोध निवडणूक
मुंबईतल्या दोन जागांसाठी भाजप आणि शिवसेनेचे उमदेवार बिनविरोध विधानपरिषदेवर जाणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपने राजहंस सिंह तर शिवसेनेने सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण आज कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजहंस सिंह आणि सुनील शिंदे यांची बिनविरोध निवड होणार आहे.


कोल्हापूरमध्ये सतेज पाटील बिनविरोध
कोल्हापूर विधान परिषदेत भाजपचे उमेदवार अमल महाडीक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. थेट दिल्लीवरून फोन आल्यानंतर अर्ज मागे घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. धुळे-नंदूरबार आणि मुंबईत काँग्रेसनं अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपनं कोल्हापूरचा मार्ग मोकळा केला आहे. 


धुळे-नंदुरबारमध्ये अमरिश पटेल बिनविरोध
धुळे-नंदुरबारमध्येही बिनविरोध निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपकजून अमरिश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने गौरव वाणी यांना उमेदवारी जाहीर केली. पण काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अमरिश पटेल यांचा मार्ग मोकळा झाला आहे.


नागपूरात आमने-सामने
मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारमध्ये साटंलोटं झालं असलं तरी नागपूरमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेस आमे सामने उभे ठाकले आहेत. भाजपकडून माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांच्यात थेट लढत रंगणार आहे. नागपूरबाबत भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नाही, त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्न नव्हता असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. त्याच वेळी विजयाची खात्री असल्याचंही ते म्हणालेत. तर काँग्रेसला अपेक्षा आहे की नागपूरमध्ये चमत्कार घडेल पण असं काही होणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे चंगल्या फरकाने जिंकून येतील, असं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


अकोल्यातही निवडणूक होणार
दुसरीकडे अकोल-बुलडाणा-वाशिम विधान परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणार आहे. भाजपचे वसंत खंडेलवाल आणि शिवसेनेकडून गोपीकिशन बजोरिया यांच्या लढत आहे.