Vidhan Parishad Election : पंकजा मुंडे यांना का डावललं? चंद्रकांत पाटील म्हणतात...
`उमेदवारीची संधी मिळाल्यास संधीचं सोनं करेन` म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांना डच्चू
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad) आज भाजपने (BJP) आपली यादी जाहीर केली. केंद्रीय समितीने पाच जणांची नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार प्रवीण दरेकर (Praveen Darekar), माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde), श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya), उमा गिरीश खापरे (Uma Khapre), प्रसाद लाड (Prasad Lad) या पाच जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. पण यादीतून पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि विनोद तावडे (Vinod Tawde) यांना मात्र संधी देण्यात आलेली नाही.
यादी जाहीर होण्याच्या एक दिवस आधी विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्ष यादीत मात्र पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं. पंकजा मुंडे यांना संधी न मिळाल्याने पंकजा समर्थकांमध्ये नाराजी आहे. उमेदवारीची संधी मिळाल्यास या संधीचं सोनं करेन, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं.
राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा व्यक्त केली होती. भाजपाच्या गेल्या काही महत्त्वाच्या कार्यक्रमातही पंकजा मुंडे यांची गैरहजेरी प्रकर्षणाने जाणवली आहे. ओबीसी आरक्षण मोर्चा, औरंगाबादमधला जलआक्रोश मोर्चा यातही पंकजा मुंडे गैरहजर होत्या.
आता विधान परिषदेच्या निमित्ताने पंकजा मुंडे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा सक्रीय होतील अशी समर्थकांची अपेक्षा होती. पण त्यांची ती अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
चंद्रकात पाटील म्हणाले आम्ही प्रयत्न केले
पंकजा मुंडे यांना संधी का देण्यात आली नाही याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितल 'आम्ही सर्व कोरी पाकीटं असतो, जो पत्ता लिहिल तिथे जात असतो, त्यामुळे राजकारणात काम करणाऱ्या व्यक्ती आणि त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते, पण निर्णय हा शेवटी संघटना करते.
विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा याबाबतचे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्राने घेतलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो. पंकजाताईंची उमेदवारी व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्राने काहीतरी भविष्यातील विचार केला असेल. पंकजाताई पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांच्याबाबत भविष्यात काही विचार केला असेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
जसं आपण पाण्यातून एखादं जहाज अचानक क्रेनने उचललं तर त्यामुळे निर्माण झालेला खड्डा पडतो तो अवघ्या काही सेकंदांत भरला जातो. तशाच प्रकारे नाराजी सुद्धा त्या पाण्यातील खड्ड्याप्रमाणे क्षणभराची असते. इच्छा व्यक्त करणं, अपेक्षा व्यक्त करणं आणि निवड न झाल्याने नाराजी व्यक्त करणं यात काही चुकीचं नाहीये असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.