Vidhan Parishad Election : भाजपचे आमदार ताज प्रेसिडेन्सीमध्ये, आज बैठकांचं सत्र
Vidhan parishad Election 2022 : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले आहेत.
मेघा कुचिक, मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीसाठी पुन्हा एकदा राजकीय पक्षांचं हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालं आहे. विविध पक्षांनी आपआपले आमदार ठरलेल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवले आहेत. आपले उमेदवार कसे जिंकून येतील यासाठी प्रत्येक पक्षामध्ये मोठे खल सुरू आहेत. (BJP MLA meeting for Vidhan parishad Election 2022)
राज्यसभा निवडणुकीत तिन्ही जागा जिंकत बाजी मारणाऱ्या भाजपने यावेळी आपले आमदार दक्षिण मुंबई इथल्या ताज प्रेसिडेन्सी इथे वास्तव्यास ठेवले आहेत. आज चार वाजता ताज प्रेसिडेन्सी इथे भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक होत आहेत. त्यानंतर पुन्हा एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. आज चार वाजेपर्यंत भाजपच्या सर्व आमदारांना कुलाबा इथल्या ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये हजर राहण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला - फडणवीस
महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला राज्यसभेच्या निवडणुकीत हलला होता. मात्र, आता येत्या 20 तारखेला तो थेट कोसळेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजपच्या आमदारांसमोर केल्याचे समजते.
देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार घडवणार ?
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय हे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आता राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस चमत्कार घडवतात का याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले आहे.