Maharashtra Politics : दोन वर्षांपूर्वी भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादीत (NCP) गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा विधीमंडळात पुन्हा प्रवेश होणार आहे. 20 जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोट्यातील 2 जागांपैकी एकावर खडसेंची वर्णी लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता तब्बल अडीच वर्षांनी विधीमंडळात पुन्हा खडसेंची तोफ धडाडणार आहे. भाजपला शह देण्यासाठीच चार दशकं भाजपात घालवलेल्या खडसेंचं अस्त्र पवारांनी बाहेर काढल्याची चर्चा आहे.


भाजपाला शह देण्यासाठी खडसेंचा उपयोग
खडसे हे संघ आणि भाजपच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. त्यामुळे भाजपमधले सगळे कच्चे दुवे त्यांना माहित आहेत. मंत्रिपद आणि आमदारकी देवेंद्र फडणवीसांमुळे (Devendra Fadanvis) गेल्याचा आरोप वारंवार खडसेंनी केलाय. त्यामुळे भाजप नेतृत्त्वाला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला खडसेंचा उपयोग होणार आहे. नेमके याचेच संकेत खडसेंनी विधानपरिषदेचा अर्ज दाखल केल्यानंतर दिले. 


'राष्ट्रवादीचा कायम ऋणी राहीन'
अडचणीच्या काळात ज्यांनी माझं राजकीय पुनर्वसन केलं, त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याची भूमिका मला पार पाडावीच लागेल, एकनाथ खडसे आता राजकारणात इतिहास जमा झाले, आता विधानमंडळात कधी पाय ठेवणार नाहीत, अशी शक्यता असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी जो विश्वास दाखवला तो मोठा आहे. संकटाच्या वेळेस साथ देणं हेच महत्वाचं आहे. त्यामुळे यांचा कायम ऋणी रहाणार आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 


भाजप सोडल्यानंतर खडसे यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकत ईडी लावली तर सीडी लावू असा दम भरला होता.


मात्र राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसेंच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला. आतापर्यंत पाच वेळा त्यांची ईडीकडून चौकशीही झालीये. मात्र त्यांनी सीडी लावल्याचा दिलेला इशारा हवेतच विरला. त्यामुळे खडसे विधीमंडळात परतल्यानंतर भाजपविरोधात कोणती अस्त्र बाहेर काढणार आणि महाविकास आघाडीला त्याचा किती फायदा होणार याचीच राजकीय विश्वात चर्चा रंगलीय.